गणपतराव देशमुखांनी रचला राज्यभरात इतिहास


आमदार गणपतराव देशमुख
सांगोला - सांगोला मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या 10 व्या विजयाने महाराष्ट्रात इतिहास घडवला असून विधानसभेत ज्येष्ठ सदस्य म्हणून तालुक्‍याचा नावलौकिक वाढविला आहे तर माजी आमदार ऍड. शहाजी पाटील यांनी पाचवेळा निवडणूक लढविली असून एक वेळाच त्यांना सत्ता मिळवता आली. ही निवडणूक दुरंगी व चुरशीची झाली. मात्र वेळोवेळी आमदार गणपतराव देशमुख यांच्या मतामध्ये घटच झाली आहे.

यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष व तिसऱ्या आघाडीकडून आमदार गणपतराव देशमुख, कॉंग्रेस पक्षाकडून शहाजी पाटील, जनस्वराज्य पक्षाकडून श्रीकांत देशमुख, सपाकडून नवनाथ देठे, शिवसेना-भाजप व शेतकरी संघटनेकडून बाळासाहेब वाळके व अपक्ष म्हणून ऍड. मच्छिंद्र पाटील यांनी ही निवडणूक लढविली होती. खरी लढत आमदार देशमुख व पाटील यांच्यातच झाली. तालुक्‍यातील 2 लाख 51 हजार 116 मतदारापैकी 1 लाख 82 हजार 963 मतदारांनी व 1035 पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये आमदार देशमुख यांना 86 हजार 54 मते, माजी आ. पाटील यांना 76 हजार 744 तर श्रीकांत देशमुख यांना 13 हजार 997 व अपक्ष ऍड. मच्छिंद्र पाटील यांना दोन हजार 506 मते तसेच वाळके यांना एक हजार 651 तसेच बसपचे नवनाथ देठे यांना दोन हजार 58 मते मिळालेली आहेत. मतदानाची सरासरी टक्केवारी 72.72 टक्के झाली.

सांगोला नगरपरिषद एक गट, जिल्हा परिषदेचे सहा गट, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील एक गट या गटामधून आमदार गणपतराव देशमुख यांना सांगोला शहरातील 23 हजार 652 मतदारांपैकी 16 हजार 431 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन हजार 312 मताची आघाडी मिळाली.

नाझरा जिल्हा परिषद गटातील बारा गावापैकी आमदार देशमुख यांना 11 हजार 221 मते, ऍड. पाटील यांना 9 हजार 992 मते मिळाली. देशमुख यांना 1 हजार 229 मताची आघाडी मिळाली. या गटातील अजनाळे, बलवडी, चिणके, ग. मंगेवाडी, चोपडी या गावातून शहाजी पाटील यांना आघाडी मिळाली आहे.

कोळा ः जि.प. गटातील 14 गावामधून आमदार देशमुख यांना 11 हजार 847 मते, शहाजी पाटील यांना 7 हजार 607 मते मिळाली. आमदार देशमुख यांना 4 हजार 240 मताधिक्‍य इतके मिळाले आहे.

जवळा जिल्हा परिषद गटातील 16 गावामधून आ. देशमुख यांना 8 हजार 797 मते, शहाजी पाटील यांना 5 हजार 361 मते मिळाली तर श्रीकांत देशमुख यांना 5 हजार 617 मते मिळाली. या गटातून आमदार देशमुख यांना 3 हजार 426 मताधिक्‍य मिळाले आहे. या गटातून श्रीकांत देशमुख यांना जवळा व सोनंद येथून आघाडी मिळाली आहे.

घेरडी जिल्हा परिषद गटातील 10 गावामधून आमदार देशमुख यांना 11 हजार 447 मते, शहाजी पाटील यांना 9 हजार 828 मते मिळाली. आमदार देशमुख यांना 1 हजार 619 मताची आघाडी मिळाली आहे.

वाढेगाव जिल्हा परिषद गटातून 12 गावामधून आमदार देशमुख यांना 12 हजार 870 मते, शहाजी पाटील यांना 11 हजार 488 मते मिळाली आहेत. या गटातून आमदार देशमुख यांना 1 हजार 382 मताची आघाडी मिळाली आहे.

महूद जिल्हा परिषद गटातून 13 गावामधून कॉंग्रेसचे शहाजी पाटील यांना 12 हजार 928 तर आमदार देशमुख यांना 11 हजार 817 मते मिळाली. या गटामधून कॉंग्रेसचे शहाजी पाटील यांना 1 हजार 111 मताची आघाडी मिळाली आहे.

भाळवणी (ता. पंढरपूर) जिल्हा परिषद गटातील 13 गावामधून कॉंग्रेसचे शहाजी पाटील यांना 12 हजार 901 मते तर आमदार देशमुख यांना 9 हजार 288 मते मिळाली. शहाजी पाटील यांना 3 हजार 613 मताची आघाडी मिळाली आहे.

तालुक्‍यातील सांगोला नगरपरिषद, सहा जिल्हा परिषद गट व भाळवणी गटापैकी गणपतराव देशमुख यांना सांगोला, जवळा, घेरडी, कोळा, नाझरा व वाढेगाव गटातून आघाडी मिळाली तर शहाजी पाटील यांना महूद व भाळवणी येथून आघाडी मिळाली आहे. तालुक्‍यातील 103 गावे व भाळवणी गटातील 14 गावे अशा सांगोला विधानसभा मतदारसंघाची 117 गावांपैकी आमदार देशमुख यांना 85 गावामध्ये, शहाजी पाटील यांना 30 गावामध्ये तर श्रीकांत देशमुख यांना दोन गावामध्ये आघाडी मिळाली आहे. ही निवडणूक दुरंगीच व चुरशीची झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातून दहा वेळा विजयी होण्याचा मान शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांना मिळाला आहे. 1962 पासून केशवराव राऊत यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. 1972 साली (कै.) काकासाहेब साळुंखे यांनी त्यांचा पराभव केला व त्यानंतर ते पोटनिवडणुकीत विजयी झाले. त्यांनी राजाभाऊ झपके यांचा पराभव केला, 1978 साली बाजीराव घाडगे, 1980 व 1985 ला पांडुरंग भांबुरे यांना व 1990 ला शहाजी पाटील यांचा पराभव केला व 1995 ला शहाजी पाटील यांनी आमदार देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर 1999, 2004 या निवडणुकीत देशमुख यांनी शहाजी पाटील यांचा पराभव केला व 2009 च्या निवडणुकीत 9 हजार 804 मतांनी विजयी झाले. त्यांचे मताधिक्‍य वारंवार घटत आले आहे. हा दहाव्यांदाच विजय म्हणजे 83 वर्षीही ते तरुणांना लाजवेल असे व महाराष्ट्रात जादा वेळा निवडून येणारे नेतृत्व मानले जात आहे हे विशेष!

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख