साखळी सिमेंट नाला बंधा-यामुळे पाण्याची शाश्वत व्यवस्था --- पालकमंत्री प्रा. ढोबळे

सोलापूर : सांगोला तालुक्यात तयार करण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधा-यामुळे पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.

लघु पाटबंधारे विभागाव्दारे सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथील साखळी सिमेंट पध्दती नाला बंधा-याचे लोकार्पण पालकंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आ. गणपतराव देशमुख, आ. दिपक आबा साळुंखे पाटील, महिला बालकल्याण अध्यक्षा जयमाला गायकवाड, सांगोला पंचायत समिती सभापती ताई मिसाळ, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपसचिव श्री. नाथ, कार्यकारी अभियंता श्री. क्षिरसागर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, जिल्हयातील 214 तलावांमधून 115 लक्ष घनमीटर गाळ खाजगी संस्था आणि शासनाने मिळून काढला आहे. तसेच दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी एकटया सांगोला तालुक्यामध्ये 40 गावांमधून 120 साखळी पध्दती सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले आहेत. तरंगेवाडी येथे बांधण्यात आलेल्या 11 बंधा-यांमुळे 258 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा होणार असून शाश्वत पाण्याचा स्त्रोत यामुळे निर्माण होणार आहे. असेही पालकमंत्री म्हणाले.

दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 125 कोटी रुपये चारा, पाणी आणि जलसंधारण कामावरती खर्च केले आहेत. बदल्या पिक पध्दतीमुळे जमिनीचा कस कमी होऊन धुप अधिक प्रमाणात होत आहे. हे थांबविण्यासाठी जलसंधारण, पाणलोट व शेततळयांच्या कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या बंधा-यांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी निश्चीतच वाढून दुष्काळावर मात करण्यात यश आले आहे.

डॉ. माळी यावेळी म्हणाल्या, जिल्हयात पाणी साठवण क्षमता व त्याचा वापर याचे प्रमाण व्यस्त झाले असल्यामुळे दुष्काळासारख्या समस्येला आपल्याला तोंड दयावे लागत आहे. यासाठी जमिनीत पावसाचे पाणी अधिकाधिक मुरविण्यासाठी अशा पध्दतीच्या बंधा-यांमुळे फायदा होणार आहे.

आ. गणपतराव देशमुख म्हणाले , शासनाने दुष्काळ निर्मूलनासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. साखळी पध्दती सिमेंट नाला बांध त्यापैकी एक होय. या उपक्रमांमुळे जमिनीतील पाणी क्षमता वाढून दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्यासाठी याची मदत होणार आहे. तरंगेवाडी येथील 11 आणि इतर 135 बंधा-यांमुळे पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयात यंदा पडलेल्या पावसामुळे या बंधा-यांमधून निश्चितच पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास चारा व टँकर मागण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

आ. साळूंखे पाटील म्हणाले , पावसाचे पाणी जमिनीत जिरवून वर्षभर ते पाणी पुरविण्यासाठी या बंधा-यांचा उपयोग होणार आहे. तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी शासनाने जलसंधारणाच्या कामासाठी 13 कोटी 27 लाख रुपये खर्च करुन साखळी पध्दती सिमेंट नाला बंधा-याचे काम केले आहे. या बंधा-याची कामे गुणवत्तापुर्ण केल्यास याचा फायदा भविष्यात होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले की, शासनाची सर्व यंत्रणा काम करीत असल्यामुळे जिल्हा गंभीर दुष्काळाच्या सावटातून बाहेर पडत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच कायमस्वरुपी उपाययोजनांतर्गत पहिल्या टप्प्यात सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांमधून 200 पेक्षा जास्त साखळी पध्दती सिमेंट नाला बंधा-यांचे काम करण्यात आले आहे. दुस-या टप्प्यात उर्वरित आठ तालुक्यांमधून अशा पध्दतीची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे लोकसहभागीता वाढवून यशस्वी करण्याची गरज आहे. बंधा-यांजवळ अधिकाधिक वृक्षारोपण करण्यासाठी नरेगातून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असेही ते म्हणाले.

या प्रसंगी जलसंधारण विभागाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिका-यांनी तर आभार प्रदर्शन प्रांताधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी केले. कार्यक्रमास अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

चंदनाचे हात, पायही चंदन!